---Advertisement---
अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानांच्या वसाहतीतच चोरट्यांनी सलग अनेक घरांवर डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे परिसरात पोलीस बंदोबस्त असतानाही ही चोरी घडल्याने सुरक्षाव्यवस्थेचा फज्जा उडाल्याची चर्चा रंगली आहे.
शनिवार-रविवारी सलग सुट्टी असल्याने काही न्यायाधीश व कर्मचारी बाहेरगावी गेले होते. कुलूपबंद घरांची अचूक माहिती चोरट्यांना असल्याचे चित्र आहे.
- ‘नल दमयंती’ इमारतीतील तीन न्यायाधीशांची घरे फोडली
- शेजारच्या ‘पैनगंगा’ इमारतीतील दोन घरांमध्ये चोरी
- कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील चार घरांवरही हात साफ
रहिवाशांच्या मते, कुलूपांवर साचलेल्या धुळीवरून बंद घरं ओळखली गेली असावीत. यावरून चोरीपूर्वी रेकी करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चोरी पहाटे अंदाजे चार वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. घटनेची खबर मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळपर्यंत सर्व घरांची तपासणी करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे झुडपांच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून पसार होताना दिसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र स्थानिकांचा प्रश्न कायम आहे.
अकोल्याला गेलेले कर्मचारी आशिष गेडाम सकाळी परतल्यानंतर चोरी उघडकीस आली. घरातील कपाट फोडून तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे दागिने काढून डबी पुन्हा बंद करून ठेवण्यात आली होती. यावरून चोरटे घरात बराच वेळ वावरले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ही घटना केवळ घरफोडी नसून सुरक्षाव्यवस्थेची मोठी कसोटी मानली जात आहे. कारण न्यायाधीशांची वसाहत असूनही चोरी झाली, दुसरीकडे पोलीस बंदोबस्त असताना हा प्रकार घडला आहे. चोरटयांनी सलग अनेक घरं लक्ष्य केले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “न्यायाधीश सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या घटनेनंतर गस्त प्रणाली, रेकीची माहिती, सीसीटीव्हीचे निरीक्षण आणि संवेदनशील भागातील सुरक्षा यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपींना अटक करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शहरवासीयांचा विश्वास परत मिळवणेही पोलिसांसाठी आवश्यक ठरणार आहे. सध्या संपूर्ण शहराचे लक्ष तपासाच्या निष्कर्षाकडे लागले आहे.









