---Advertisement---
मोबाईलच्या किरकोळ कारणावरून कुटुंबातील वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यात उघडकीस आली आहे. वालंबा (पोस्ट डाब) येथे एका पतीने पत्नीवर विळ्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पती व सासूविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविताबाई चंदन पाडवी (वय 30) यांनी रात्री उशिरा मोबाईलचा आवाज कमी करण्यास पती चंदन जरसिंग पाडवी यांना सांगितले. मुलगी झोपेतून जागी होईल, या कारणाने त्यांनी आवाज कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, या साध्या गोष्टीवरून पती संतापला. रागाच्या भरात त्याने घरातील विळा उचलून पत्नीच्या डाव्या पायावर आणि पाठीवर वार केल्याचा आरोप आहे. घटनेदरम्यान सासू सायदीबाई पाडवी यांनीही पीडितेला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे सांगितले जाते. मोबाईलच्या किरकोळ कारणावरून कुटुंबात हा निर्मण झाला असून या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यात वालंबा येथे घडली आहे.
या घटनेनंतर जखमी अवस्थेत कविताबाईंनी मोलगी पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 118(1), 115, 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढणारा चिडचिडेपणा आणि संवादाचा अभाव कुटुंबातील नातेसंबंधांवर गंभीर परिणाम करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. दुर्गम ग्रामीण भागातही मोबाईल व्यसनाचे दुष्परिणाम दिसू लागल्याने सामाजिक स्तरावर जागरूकता गरजेची असल्याची भावना व्यक्त होत आहे.









