---Advertisement---
जळगाव शहरात मानवता, धैर्य आणि प्रसंगावधानाचे उदाहरण ठरलेली एक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांचा एक बालक घरात खेळत असताना ॲल्युमिनियमचे छोटे भांडे मुकुट समजून डोक्यावर घातले. मात्र काही क्षणातच ते भांडे डोक्याला आणि मानेजवळ इतके घट्ट अडकले की त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. घाबरलेल्या पालकांनी तातडीने मुलाला विविध रुग्णालयांत नेले, पण संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेकांनी उपचारास नकार दिला. अखेर बालकाला जळगावमधील सारा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. येथे डॉ. मिनाज पटेल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जबाबदारी स्वीकारली.
सुरुवातीला ग्रीस व इतर सुरक्षित उपायांनी भांडे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते निष्फळ ठरले. त्यानंतर रुग्णालयातील अनुभवी प्लंबर खालिद शेख यांना बोलावण्यात आले. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मुलाच्या डोक्याभोवती वुडन पीयूसी शीट आणि ओले कापड लावून संपूर्ण सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली.
यानंतर ग्राइंडर कटरच्या सहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक कट देण्यास सुरुवात झाली. सुमारे 12 मिनिटे 10 सेकंद चाललेल्या या थरारक प्रयत्नात तीन अचूक कट दिल्यानंतर भांडे सैल झाले आणि अखेर बालकाचे डोके सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. विशेष म्हणजे, डोक्यापासून अवघ्या दीड इंच अंतरावर कटिंग करूनही बालकाला कोणतीही इजा झाली नाही.
या धाडसी आणि कौशल्यपूर्ण कार्याबद्दल एकता संघटना यांच्या वतीने डॉ. मिनाज पटेल आणि प्लंबर खालिद शेख यांचा शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेने दोघांनाही शौर्य सन्मान देण्याची मागणी केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जळगावकरांकडून डॉक्टर आणि प्लंबरच्या धैर्याचे कौतुक होत आहे. ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की, खरे नायक पदाने नव्हे तर कृतीने ओळखले जातात.









