---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली होती. चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली होती. घटना हातेड-अन्वर्दे शिवार परिसरात घडली असून या मारहाणीत दोघेही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे शशिकांत पारधी आणि राकेश पाटील अशी असून, हाणामारीत राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, त्यांच्यावर चोपडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ड्युटी लावण्याच्या वादावरून हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात भेट झाली. यावेळी आधीपासून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. ड्युटी वाटप, हजेरी नोंद आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वैमनस्य होते. त्याच वैमनस्यातून ही धक्कादायक हाणामारी झाल्याच समोर आलं.
या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची चौकशी सुरू होती. यात रचनेचा तपास पूर्ण झाल्यानंतर याप्रकरणी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून भारतीय न्याय संहिता कलम 194/2 प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी दिली आहे. झालेल्या या निलंबनाच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.









