---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील यावल-टाकरखेडा मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ईको कारला एसटी बसने दिलेल्या जोरदार धडकेत सुमारे १० ते १२ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसातच्या सुमारास एमएच ४० एन ९८४५ क्रमांकाची यावल-टाकरखेडा मार्गावरील एसटी बस भालशिव पिंप्री फाट्याजवळून जात असताना समोरून एमएच ३७ जी ६६८० क्रमांकाची ईको कार आली. ही कार भालशिव पिंप्रीकडून यावलमधील एका खासगी शाळेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि अपघात घडला.

अपघातात कारचालकासह अनेक विद्यार्थी जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना त्वरित यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय पथक त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विद्यार्थी वाहतूक करणारी ईको कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते.
दरम्यान, यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्यास भेट देत घटनेची माहिती घेतली तसेच जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या अपघातामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीतील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील तपासानंतरच अपघाताचे अचूक कारण स्पष्ट होणार आहे.









