सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा महागाईचा धक्का; गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ, जाणून घ्या भाव काय ?

---Advertisement---

 

सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा महागाईचा धक्का बसला आहे. देशभरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ केली आहे. तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन दर आज म्हणजेच ७ मार्चपासून लागू झाले आहेत.

या वाढीचा थेट परिणाम घरगुती ग्राहकांसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांवर होणार आहे. जळगावमध्ये यापूर्वी ८५८.५० रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर आता ९१८.५० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चावर पुन्हा ताण वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्येही घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून वाढून ९१३ रुपये झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,७६४ रुपयांवरून वाढून १,८८३ रुपये झाली आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत याआधी ८ एप्रिल २०२५ रोजी ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर दीर्घकाळ दर स्थिर होते. मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. दरम्यान, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत गेल्या महिन्यात १ फेब्रुवारी रोजी ५० रुपयांनी वाढवण्यात आली होती.

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल आणि गॅसच्या किमतींबाबत अनिश्चितता वाढली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर जागतिक ऊर्जा बाजारात मोठी हालचाल दिसून येत आहे. त्याचा परिणाम भारतातील एलपीजीच्या किमतींवरही झाल्याचे मानले जात आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, भारत आपल्या एलपीजीच्या गरजांचा मोठा हिस्सा आयातीद्वारे पूर्ण करतो. गेल्या आर्थिक वर्षात देशात सुमारे ३१.३ दशलक्ष टन एलपीजीचा वापर झाला होता. त्यापैकी फक्त १२.८ दशलक्ष टन एलपीजी देशांतर्गत उत्पादनातून उपलब्ध झाले. उर्वरित गरज भागवण्यासाठी भारताला आखाती देशांसह इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून गॅस आयात करावा लागतो.

यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्यास त्याचा परिणाम भारतातील गॅसच्या दरांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---