---Advertisement---
भुसावळ : यावल तालुक्यातील पाडळसा येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. १० ते १६ मार्च दरम्यान सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे बदल लागू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी दररोज हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष नियोजन केले आहे. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) तर्फे ५० अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. भुसावळ येथून कथास्थळी जाण्यासाठी १५ बसेस चालविण्यात येणार असून प्रवासासाठी सुमारे १६ रुपये भाडे आकारले जाणार आहे. तसेच दोन ठिकाणी तात्पुरते बस डेपो उभारण्यात आले असून व्यवस्थापनासाठी सुमारे ५० अधिकारी व कर्मचारी दोन शिफ्टमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक डी. जी. बंजारा यांनी दिली.
दरम्यान, भुसावळ-फैजपूर रोडवरील हॉटेल रिव्हर पॉईंट ते भौरटेक फाटा दरम्यानचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. भुसावळ ते फैजपूर जाणारी वाहने अकलूद जुना टोल नाका येथून यावल मार्गे वळविण्यात आली आहेत. रावेर, सावदा आणि फैजपूरकडून भुसावळकडे येणारी लहान वाहने सावदा येथील बनाना सिटीमार्गे हतनूर-बोहर्डी फाटा मार्गे वळविण्यात आली आहेत. जड वाहने यावल-किनगाव मार्गे जळगाव कडे वळविण्यात आली आहेत.
तसेच चोपडा–यावल ते भुसावळ वाहतूक धानोरा फाटा येथून डांभुर्णी-जळगाव मार्गे वळविण्यात आली आहे. भुसावळहून फैजपूरकडे जाणारी अवजड वाहने जळगाव-डांभुर्णी-किनगाव-यावल मार्गे वळविण्यात आली आहेत.
दरम्यान, भुसावळ आगारातील काही बसेस कथेसाठी वापरण्यात येणार असल्याने नियमित मार्गांवरील काही एसटी फेर्या उशिरा धावण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता असल्याचे आगार प्रशासनाने स्पष्ट केले असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









