---Advertisement---
रावेर शहरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी चोरट्यांनी थेट नगरसेवक दिलीप पाटील यांच्या घरालाच लक्ष्य केले. त्यांच्या घरातून सुमारे ११ तोळे सोने, २५० भार चांदी आणि सुमारे १० लाख रुपयांची रोकड असा मोठा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.
रामबाग मैदान परिसरात राहणारे दिलीप पाटील हे गुढीपाडव्याच्या रात्री कुटुंबासह घरात झोपलेले असतानाच ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करत खिडकीवरील लोखंडी गज कापले आणि आत शिरले. घरातील कपाट फोडून त्यांनी दागिने आणि रोकड उचलली. विशेष म्हणजे, चोरीदरम्यान घरातील कुणालाही याची चाहूल लागली नाही. सकाळी उठल्यानंतरच घरफोडी उघडकीस आली.
चोरट्यांनी नेलेल्या ऐवजात सोन्याच्या पट्ट्या, नेकलेस, अंगठ्या आणि इतर दागिन्यांसह पायातील चांदीचे तोरडे यांचा समावेश आहे. दिलीप पाटील यांनी नुकतेच त्यांचे गट क्रमांक ७७६/१ मधील शेत विकले होते आणि त्या व्यवहारातून मिळालेले १० लाख रुपये त्यांनी घरात ठेवले होते. ही संपूर्ण रक्कमही चोरट्यांनी लंपास केली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. तपासासाठी जळगाव येथून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला बोलावण्यात आले आहे.
रावेरच्या मध्यवर्ती रामबाग परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नागरिकांनीही पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.









