---Advertisement---
जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव येथील जैन हिल्सवर केळी उत्पादन क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठत भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
या करारानुसार ‘कावेरी वामन’ आणि ‘कावेरी पूवन’ या दोन सुधारित केळी जातींची रोपे टिश्यू कल्चर पद्धतीने तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे केळी उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
करारावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन , व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन , तसेच राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक Dr. आर.सेलवाराजन यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे , मंत्री गिरीश महाजन आणि खासदार स्मिता वाघ यांनीही उपस्थिती दर्शवली.
‘कावेरी वामन’ची वैशिष्ट्ये
‘कावेरी वामन’ ही जात ग्रँड नैन जातीपासून विकसित करण्यात आली असून झाड बुटक्या स्वरूपाचे आहे. १५०–१६० सें.मी. उंची असलेले हे झाड वाऱ्याला कमी झुकते, त्यामुळे आधाराची गरज कमी भासते. या जातीचे घड १८ ते २५ किलो वजनाचे असून हेक्टरी ५५ ते ६० टन उत्पादन मिळते. ही जात ११–१२ महिन्यांत कापणीसाठी तयार होते.
‘कावेरी पूवन’ची वैशिष्ट्ये
‘कावेरी पूवन’ ही पूवन जातीवर आधारित असून १५ वर्षांच्या संशोधनातून विकसित करण्यात आली आहे. ही जात विषाणूजन्य रोग व फुसारिअम विल्ट (TR-1, TR-4) सारख्या घातक रोगांना प्रतिकारक आहे. तसेच खारट आणि क्षारयुक्त जमिनीतही चांगले उत्पादन देते. स्थानिक पूवन जातीपेक्षा सुमारे २० टक्के अधिक उत्पादन देण्याची क्षमता या जातीमध्ये आहे.
या करारामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना उच्च दर्जाची रोपे उपलब्ध होणार असून उत्पादनवाढीसह खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.








