---Advertisement---
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या लाखो सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. अनेक वर्षांपासून दावा न केलेल्या निष्क्रिय पीएफ खात्यांमधील न भरलेल्या निधीचे निराकरण करण्यासाठी ईपीएफओ आता आपले प्रयत्न तीव्र करत आहे. वृत्तानुसार, ही संघटना एक स्वयंचलित निराकरण प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत आहे. ज्याअंतर्गत खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम थेट लाभार्थ्याच्या आधार-संलग्न बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
प्रस्तावित योजनेनुसार, पीएफमधून पैसे काढण्यासाठी दावा दाखल करण्याची लांबलचक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया दूर करणे, हे या नवीन यंत्रणेचे उद्दिष्ट आहे. या निर्णयामुळे अंदाजे ८.१ लाख आधार-सत्यापित निष्क्रिय खात्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. अशा खात्यांमध्ये सुमारे ५,२०० कोटी रुपयांची रक्कम जमा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, ईपीएफओचे आधार-सत्यापित निष्क्रिय
खात्यांपैकी अंदाजे २५ टक्के खात्यांवर प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे अशा लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, जे प्रक्रियेच्या माहितीच्या अभावामुळे किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे त्यांच्या जुन्या ठेवी काढू शकले नाहीत.
अहवालानुसार, निष्क्रिय खात्यांमध्ये मोठ्या ठेवी आहेत. सुमारे १४,००० खात्यांमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त ठेवी आहेत. तर ३८,००० खात्यांमध्ये १ लाख ते ५ लाख दरम्यान ठेवी आहेत. तसेच ४१,००० खात्यांमध्ये ५०,००० ते १ लाख दरम्यान शिल्लक आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाने प्रायोगिक प्रकल्प म्हणून १,००० पर्यंत शिल्लक असलेल्या निष्क्रिय खात्यांच्या स्वयंचलित सेटलमेंटला आधीच मंजुरी दिली आहे.
खाते कसे ठरते निष्क्रिय?
ईपीएफओच्या नियमांनुसार, जेव्हा खात्यावर व्याज मिळणे थांबते, तेव्हा ते खाते निष्क्रिय ठरते. साधारणपणे, जर एखादा सदस्य वयाच्या ५५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाला आणि सलग तीन वर्षे कोणतेही योगदान दिले गेले नाही तर ते खाते निष्क्रिय मानले जाते. तथापि, ५५ वषर्षांपेक्षा कमी वयाच्या सदस्यांसाठी ते ५८ वर्षांचे होईपर्यंत खात्यावर व्याज जमा होत राहते. फेब्रुवारी २०२६ पर्यंत, ईपीएफओकडे अंदाजे ३१.८ लाख निष्क्रिय खाती असून, त्यामध्ये एकूण १०,१८१ कोटी रुपयांची ठेव आहे. यापैकी, अंदाजे ७ लाख खाती दोन दशकांपेक्षा जुनी आहेत.









