जळगाव महामार्ग होणार अतिक्रमणमुक्त; वाहनधारकांना ७ दिवसांचा अल्टिमेटम

---Advertisement---

 

शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि बेकायदेशीर पार्किंगला आळा घालण्यासाठी जळगाव महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला असून, संबंधित वाहनधारकांना ७ दिवसांत वाहने हटवण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.


बुधवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त धनश्री शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, ‘नही’चे अधिकारी राहुल पाटील आणि अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर उपस्थित होते.


महामार्गाचा काही भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अखत्यारीत असल्याने, १ एप्रिलपासून मनपा, ‘नही’ आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होणार आहे. खेडी ते खोटे नगर दरम्यानचा महामार्ग पूर्णपणे मोकळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.


महामार्गालगत उभ्या राहणाऱ्या कार व दुचाकी बाजारांवरही कारवाई होणार असून, १ एप्रिलपासून हे बाजार हटवले जाणार आहेत. तसेच, शहरातील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी ३० मार्चपासून रस्त्यांवर पिवळे व पांढरे पट्टे आखून अधिकृत पार्किंग स्पॉट निश्चित केले जाणार आहेत.
फेरीवाल्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात येत असून, त्यांना मनपाच्या मोकळ्या जागांवर ‘खाऊगल्ली’च्या स्वरूपात स्थलांतरित केले जाणार आहे.


महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “सात दिवसांच्या आत महामार्गावरील वाहने स्वतःहून हटवावीत आणि प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा १ एप्रिलपासून जप्तीची कठोर कारवाई करण्यात येईल.”
शहरातील इतर अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---