LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर बायोगॅस ठरतोय वरदान; नशिराबादच्या शेतकऱ्याचा आदर्श

---Advertisement---

 

आखाती भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे LPG गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, ग्रामीण भागात बायोगॅस हा प्रभावी व पर्यावरणपूरक पर्याय ठरत असल्याचे नशिराबाद येथील उदाहरणातून स्पष्ट होत आहे.


नशिराबाद (ता. जळगाव) येथील प्रगतिशील शेतकरी चंदन पाटील यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी उभारलेले बायोगॅस युनिट आजही पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, त्यांच्या कुटुंबाचा दैनंदिन स्वयंपाक या युनिटवरच केला जात आहे.


याबाबत सौ. निशा पाटील यांनी सांगितले की, “दररोज ६ जणांचा दोन्ही वेळचा स्वयंपाक बायोगॅसवर होतो. पावसाळ्यात किंवा पाहुण्यांची संख्या वाढल्यास वर्षाकाठी केवळ एकच LPG सिलेंडर लागतो.”


बायोगॅस युनिटमुळे इंधनासोबतच शेतीसाठी सेंद्रिय खताचीही उपलब्धता होत आहे. शेतकरी चंदन पाटील यांच्या मते, “बायोगॅस निर्मितीसोबतच वर्षाकाठी सुमारे ४ ते ५ टन सेंद्रिय खत मिळते. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर व खर्च कमी होतो.”


दरम्यान, जिल्हा परिषद जळगावच्या कृषी विभागामार्फत ‘नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम’ अंतर्गत गेल्या पाच वर्षांत ३२१ बायोगॅस युनिट्सची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेमुळे अनेक शेतकरी इंधन आणि खत या दोन्ही बाबतीत स्वयंपूर्ण होत आहेत.


तज्ज्ञांच्या मते, LPG टंचाईच्या संभाव्य पार्श्वभूमीवर बायोगॅससारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे गरजेचे असून, यामुळे ग्रामीण भागात ऊर्जा स्वावलंबन साध्य होऊ शकते.


जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ‘नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम’चा लाभ घ्यावा व स्वस्त इंधनासह सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---