---Advertisement---
सावदा शहरातील सहकारी दूध उत्पादक संस्थेमध्ये बेकायदेशीरपणे विदेशी दारूची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी छापेमार कारवाई करत हा प्रकार उघड केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या मागील खोलीत विदेशी दारूचा साठा करून विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष तातडीने छापा टाकला.
छाप्यामध्ये डेअरीच्या किचन रूममध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये 750 एमएलच्या 9 सिलबंद विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची किंमत सुमारे 13 हजार 500 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी हा साठा जप्त करत पुढील कारवाई सुरू केली.
या प्रकरणात संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे (वय 46, रा. सावदा) याने विक्रीसाठी दारू आणल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या अवैध दारू विक्रीमध्ये संस्थेच्या संचालक मंडळाचा काही संबंध आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सहकारी संस्थांमधील गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पो.हे.कॉ उमेश पाटील, पो.ना. जाकीर मन्सुरी आणि पो.कॉ मयूर पाटील यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.









