---Advertisement---
बांगलादेश : भीषण दुर्घटनेत पद्मा नदीमध्ये प्रवाशांनी भरलेली बस कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात सुमारे ४० ते ५० प्रवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही घटना बांगलादेशातील दौलतदिया फेरी टर्मिनलवर येथे सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. ढाक्याकडे जाणारी ही बस फेरीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट पॉन्टूनवरून नदीत कोसळली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बस सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाली आहे. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत पोहत काठ गाठला, मात्र अनेक प्रवासी बसमध्येच अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, फेरीवर चढण्यासाठी उभी असताना एका लहान फेरीने पॉन्टूनला धडक दिल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या धडकेमुळे बसचा तोल जाऊन ती थेट नदीत कोसळली.
अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून अग्निशमन दल, नागरी संरक्षण पथक, नदी पोलीस आणि फेरी प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावासाठी विशेष रेस्क्यू व्हेसल तैनात करण्यात आले असून, अतिरिक्त पाणबुडे पथकांना देखील पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, बुडालेल्या बसचे अचूक स्थान शोधण्यात यश आले असून, आतापर्यंत काही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मात्र उर्वरित प्रवाशांचा ठावठिकाणा अद्याप स्पष्ट नसल्याने चिंता वाढली आहे.
प्रशासनाने अद्याप मृतांची अधिकृत संख्या जाहीर केलेली नसली तरी परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेमुळे बांगलादेशातील प्रमुख वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या दौलतदिया-पाटुरिया मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.









