---Advertisement---
लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
याबाबतची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
दरम्यान, मार्च महिना संपत आला तरी फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता, त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
यासाठी सामाजिक न्याय विभागाने सुमारे २२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीला मान्यता मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत असून, सरकारकडून नियमितपणे हा सन्मान निधी दिला जात आहे.
जर तुमच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नसेल, तर पुढील दोन-तीन दिवसांत ती जमा होण्याची शक्यता आहे.









