तरुण अभ्यासात अन् चोरट्यांची एन्ट्री, तीन लॅपटॉप दोन मोबाईल घेत फरार

---Advertisement---

 

जळगाव : घरात एका रुममध्ये दोघे तरुण अभ्यास करत होते. चोरट्यांनी दरवाजा लोटुन घरात दुसऱ्या रुममध्ये एन्ट्री केली. तीन लॅपटॉप, दोन मोबाईल असा सुमारे ६५ हजार किमतीचा मुद्देमाल चोरुन फरार झाले. शहरातील गणेश कॉलनीत एका बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर ही घटना गुरुवारी (२६ मार्च) रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास घडली.

जसवंत अनजाने यांचा शहरातील गणेश कॉलनीत सर्वज्ञ बंगला आहे. ते पेशाने शिक्षक आहेत. त्यांच्या बंगत्यातील दुसऱ्या मजल्यावर योगेश जाधव यांच्यासह ऋषीकेश धांडे तसेच संकेत हे तरुण राहतात. योगेश हे जॉब करतात. तर ऋषीकेश आणि संकेत पदवीचे शिक्षण घेताहेत.

रात्री नेहमी हे तिघे घरी थांबले होते. दरम्यान सात वाजता जॉबवर जाण्याचा वेळ झाल्याने योगेश हे दरवाजा बाहेरुन लोटुन ड्यूटीवर निघुन गेले. तेव्हा एका रुममध्ये ऋषी आणि संकेत हे अभ्यास करत होते. दुसऱ्या रुममध्ये दोन लॅपटॉप ठेवलेले होते.

चोरट्यांनी साधली संधी

योगेश जाधव घराबाहेर पडल्याची संधी दिसताच चोरट्यानी दुसरा मजला गाठला. घराचा दरवाजा लोटुन त्यांनी प्रवेश केला. तीन लॅपटॉप आणि दोन मोबाईल घेत पोबारा केला. काही अवधीनंतर रुममधुन दुसऱ्या रुममध्ये आला असता लॅपटॉप आणि मोबाईल त्याला दिसले नाही. त्याने मित्राला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तत्काळ योगेश जाधव यांना लॅपटॉप व मोबाईलची विचारणा केली असता ते रुममध्येच होते असे सांगितले. त्यानंतर चोरी झाल्याची तिघांची खात्री झाली. त्यांनी ही घटना जिल्हा पेठ पोलिसांना दिली.


असा नेला मुद्देमाल

ऋषीकेश याचा एचपी कंपनीचा सुमारे १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, योगेश जाधव यांचा सुमारे १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, संकेत शेळके याचा सुमारे १५ हजार रुपये किमतीचा एक लॅपटॉप, तसेच दहा हजार रुपये किमतीचा मोटोरोला मोबाईल, ऋषीकेश धांडे याचा रेलमी कंपनीचा सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला.

सीसीटीव्ही मात्र मालक गावी

घरमालक हे शिक्षक आहेत. ते याठिकाणी तळ मजल्यावर कुटुंबासह राहतात. बंगल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याचा डिव्हीआर बॉक्स त्यांच्या घरात आहे. हे सर्व जण काश्मिरला गेले आहेत. ते सोमवारी (३० मार्च) जळगावला येणार आहेत. दरम्यान कॅमेरा स्टोर तसेच बॅकअप करत होता किंवा कसे? याबाबी घरमालक आल्यानंतर स्पष्ट होईल.

याप्रकरणी ऋषीकेश चांगदेव धांडे (वय २७ रा. गाडे पिंपळगाव, ता. वैजापूर, हमु जळगाव) याच्या तक्रारीनुसार याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी घटनास्थळी जावुन प्रकार जाणुन घेतला. महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे हे तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---