---Advertisement---
Ladki Bahin Yojana eKYC: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय अशा लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली असून आता महिलांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत eKYC पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
याआधी या प्रक्रियेची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ होती. मात्र अनेक महिलांना तांत्रिक अडचणी, चुकीची माहिती भरणे आणि इतर कारणांमुळे eKYC पूर्ण करता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जात असला तरी काही अपात्र आणि बोगस लाभार्थ्यांनीही याचा फायदा घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी eKYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली.
दरम्यान, या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांनी अर्ज भरताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे त्यांचा हप्ता बंद झाला होता. तसेच संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळेही काही महिलांचे eKYC प्रलंबित राहिले होते. तरीही आतापर्यंत सुमारे १ कोटी ७० लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आता नव्याने दिलेल्या मुदतवाढीमुळे ज्या महिलांचे eKYC अद्याप झालेले नाही, त्यांना पुन्हा एक संधी मिळाली आहे. प्रशासनाकडून सर्व पात्र महिलांनी वेळेत eKYC पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









