---Advertisement---
दिनेश पालवे अमळनेर प्रतिनिधी : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. आता SSC परीक्षेच्या निकालासोबतच विद्यार्थ्यांना वेगळे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट घेण्याची गरज राहणार नाही. मंडळाने दोन्ही कागदपत्रे एकत्र करून एकच प्रमाणपत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे.
फेब्रुवारी-मार्च 2026 पासून हा नवा नियम लागू होणार असून विद्यार्थ्यांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र असे दोन वेगवेगळे दस्तऐवज सांभाळावे लागत होते. मात्र आता एकाच प्रमाणपत्रात सर्व माहिती मिळणार असल्याने कागदपत्रांचा गोंधळ आणि हरवण्याचा धोका कमी होणार आहे.
यासोबतच बोर्डाने प्रमाणपत्रावरील नावाच्या फॉरमॅटमध्येही महत्त्वाचा बदल केला आहे. पूर्वी आडनाव आधी आणि नंतर नाव असे स्वरूप होते. मात्र आता प्रथम विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा नवा क्रम असणार आहे. हा बदल अधिक स्पष्ट आणि सोपा असल्याचे मंडळाने सांगितले आहे.
विद्यार्थ्यांच्या फोटोंबाबतही बोर्डाने कडक भूमिका घेतली आहे. हॉल तिकीट किंवा नोंदीतील फोटो अस्पष्ट असल्यास तो त्वरित बदलून शाळेकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सध्या शाळांकडून विद्यार्थ्यांची माहिती आणि फोटो पडताळणीचे काम वेगाने सुरू आहे.
मंडळाकडून विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपले हॉल तिकीट काळजीपूर्वक तपासावे. नाव, स्पेलिंग किंवा फोटोमध्ये काही चूक आढळल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी.
या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा नोकरीसाठी अर्ज करताना कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. त्यामुळे हा बदल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.









