---Advertisement---
जळगाव : महाविद्यालयात जाते, असे कुटुंबियांना सांगुन घराबाहेर पडलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती. ही मुलगी नाशिक येथे पोलिसांच्या मदतीने कुटुंबियांच्या स्वाधीन केली होती. तिला रेल्वेतून गावी नेत असताना ब्रश करुन येते असे सांगुन गेली आणि रेल्वेतून बेपत्ता झाली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची नोंद करण्यात आली.
१९ वर्षीय तरुणी मुळ मध्यप्रदेशातील आहे. ती बजरिया म.प्र. येथे शिक्षण घेत आहे. सोमवारी (३० मार्च) सकाळी साठेआठ वाजेच्या सुमारास मी कॉलेजला जाते, असे कुटुंबियांना सांगुन ही तरुणी घराबाहेर पडली. त्यानंतर माध्यमिक विद्यालयाजवळ करारिया फार्म पो. बजरिया (भोपाळ म.प्र.) येथुन बेपत्ता झाली. तरुणी घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता तपास लागला नाही. याप्रकरणी बजरीया पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती.
मुळ नेपानगरचा तरुण नाशिक येथे राहतो. त्याच्याकडे ही मुलगी राहत असल्याचा संशय तिच्या कुटुंबियांना होता. आणि त्यांनी स्थानिक नातेवाईकांच्या मदतीने तिचा शोध घेण्याचा निर्णय घेतला व नाशिक येते आले. मुलगा त्याच्या मावशीकडे सातपुर येथे वास्तव्य करतो. त्याच ठिकाणी ही मुलगी थांबली असल्याची कुटुंबियांना विश्वनीय माहिती मिळाली. त्यानुसार नाशिक सातपूर पोलीस ठाण्यात जावुन मुलीच्या कुटुंबियांनी प्रकार कानावर टाकला. पोलिसांनी संपुर्ण माहितीची खात्री केली. त्यानंतर मुली आणि मुलाच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलविले. मुलगा आणि मुलीच्या नातेवाईकांनी खुली चर्चा केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलीचे या मुलाशी लग्न लावून देऊ, अशी ग्वाही मुलीच्या कुटुंबियांनी दिली. तसेच पोलिसांच्या माध्यमातून या मुलीस तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले. मुलीला सोबत घेत कुटुंब बुधवारी (१ एप्रिल) महानगरी एक्सप्रेसच्या कोच एस/४ डब्यातून रेल्वे स्टॉप पासवर नाशिक ते भोपाल असा प्रवास करीत होते.
प्रवासा दरम्यान बुधवारी (१ एप्रिल) ६.४५ वाजेच्या सुमारास ब्रश करुन येते, असे कुटुंबियांना सांगुन गेली. बऱ्याच उशिरापर्यत मुलगी परतली नसल्याने कुटुंबियांनी तिचा कोचमध्ये भुसावळपर्यत शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. मुलगी रेल्वेत हरविली म्हणून कुटुंबियांनी तक्रार दिली. त्यानुसार भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली.
हरविलेल्या मुलीचे वय वर्ष १९ आहे. तिची उंची पाच फुट एक इंच असुन रंग गोरा आहे. अंगात पिवळ्या रंगाची सलवार सुट त्यावर पांढरे रंगाचे फुलांचे डिझाईन असा ड्रेस तिने परिधान केला आहे. या वर्णनाची मुलगी निदर्शनास आल्यास अथवा तिच्याबद्दल माहिती मिळाल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मिसिंग तपास हवालदार हिरालाल चौधरी हे करीत आहेत.









