---Advertisement---
जळगाव : शिवाजी नगरातून जाणाऱ्या ममुराबाद रस्त्यासाठी ५ मीटर जागेचे भूसंपादन मनपातर्फे करण्यात आले होते. परंतु त्या जागेची रक्कम अदा न केल्याने न्यायालयाने आयुक्तांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र मनपाने त्याबदल्यात २५ लाखाचा धनादेश दिल्याने आयुक्तांच्या खुर्चीवरील जप्तीची नामुष्की टळली. दरम्यान महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसमोर हा संपूर्ण प्रकार घडल्याने पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
महापालिकेने शिवाजी नगरातून जाणाऱ्या ममुराबाद रस्त्यासाठी जागेचे भूसंपादन केले होते. स्व हितेंद्र मेहता यांच्याकडून शिवाजीनगर स्मशानभूमीजवळील गट नं. ५११ सिटी सर्वे न.२७१० मधील पाच मीटर जागा भूसंपादन . केली होती. त्यासाठी ३ कोटी २० लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. या जागेचे महापिालकेने काही रक्कम अदा केली होती. त्यापैकी २ कोटी ३२ लाख रक्कम बाकी होती. ती अदा केलेली नव्हती. या प्रकरणी स्व. हितेंद्र मेहता यांचे वारसदार पुष्पा हितेंद्र मेहता यांनी जागेच्या मोबदल्यासाठी महापालिके च्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली न्यायालयाने थकित रकमेपोटी आयुक्तांची खुर्ची व वाहन जप्त करण्याचे आदेश दिले.
२५ लाखाचा धनादेश दिला
न्यायालयाचा आदेश आल्यानंतर जप्ती टाळण्यासाठी तातडीने २५ लाख रूपयांचा धनादेश न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे तुर्तास तरी आयुक्तांच्या खुर्चीवरील जप्ती टळली आहे.
मनपात खळबळ
न्यायालयाचा आदेश घेवून यिाचकार्त्यांचे वकिल अॅड. लाठी महापालिकेत दाखल झाले. त्यांनी थकबाकी रक्कम अदा करा अन्यथा आयुक्तांची खुर्ची व वाहन आपण न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी सतराव्या मजल्यावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी वकील लाठी उपस्थित होते. त्यांनी काही रक्कम भरल्यास ही जप्ती टळू शकते असे सांगितले त्यानंतर महापालिकेने २५ लाख रूपयाचा धनादेश न्यायालयात जमा केला.









