---Advertisement---
केंद्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी सुरू आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला शक्तीच्या भूमिकेचा गौरव करत हा निर्णय २१ व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असे सांगितले.
विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, देशाच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी आता असा निर्णय आवश्यक आहे जो महिलांच्या सन्मान आणि सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवेल. हा केवळ धोरणात्मक बदल नसून समाजात समानतेची संकल्पना अधिक बळकट करणारा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी यावेळी असेही सांगितले की, संसद एका नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर उभी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणण्याची आणि भविष्यासाठी ठोस दिशा देण्याची ही संधी आहे. सामाजिक न्यायाची अंमलबजावणी केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता ती प्रत्यक्ष कृतीत दिसली पाहिजे, असेही म्हणाले
महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा राज्य विधानमंडळांपासून ते संसदेपर्यंत अनेक दशकांपासून चर्चेत आहे, याचीही त्यांनी आठवण करून दिली. २०२३ मध्ये नव्या संसद भवनात या संदर्भात कायद्याच्या रूपाने पहिले पाऊल टाकण्यात आले होते. आता त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे विशेष अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी एकत्रित प्रयत्नांवर भर दिला. देशभरातील महिलांचा पाठिंबा आणि सहभाग मिळाल्यास या उपक्रमातून एका नव्या युगाची सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.









