वीजपुरवठ्याची तक्रार करा आता ‘१९१२’ टोल फ्रीवर

---Advertisement---

 

जळगाव : वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज कर्मचारी किंवा त्यांच्या वरिष्ठांना फोन करण्याऐवजी वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या १९१२, १८००-२३३-३४३५ व १८००-२१२-३४३५ या तीनपैकी एका टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा व वीजबिलासंबंधीच्या तक्रारीं नोंदवाव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणची यंत्रणा टोल फ्री क्रमांकावर मिळालेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्यासाठी २४ तास कार्यरत आहे.

वीजपुरवठा व वीजबिलासंबंधी तक्रार तात्काळ नोंदवण्यासाठी १९१२, १८००-२३३-३४३५ व १८००-२१२-३४३५ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. हे क्रमांक संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. तक्रार नोंदवताना ग्राहकांनी त्यांचा १२ अंकी ग्राहक क्रमांक नोंदवल्यास महावितरणला त्या ग्राहकाशी संबंधित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. ती तक्रार थेट संबंधित शाखा कार्यालयाला वर्ग होते. तसेच तक्रारीची नोंद ऑनलाईन प्रणालीत झाल्यामुळे विद्युत नियामक आयोगाने घालून दिलेल्या कृती मानकांनुसार वेळेत सोडवणे बंधनकारक बनते.

फोनवर केलेल्या तक्रारींची नसते नोंद

ज्याप्रमाणे टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारींची नोंद ऑनलाईन प्रणालीत होते. त्याउलट एखाद्या वीज कर्मचाऱ्याला फोनवर आलेल्या तक्रारींची नोंद होत नाही. कारण ज्यावेळी एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित होतो, तेव्हा एकाच वेळी त्याला अनेक फोन येतात. तसेच फोन चालू असल्यामुळे त्याला फॉल्ट शोधता येत नाही. खांबावर किंवा वीज वाहिनीवर काम करताना घेतलेला कॉल त्याचा जीवावरही बेतू शकतो. त्यामुळे वैयक्तिक फोन करणे टाळावे.

एसएमएस व मिस कॉलद्वारेही नोंदवा तक्रार

वीजग्राहकांनी महावितरणकडे नोंदवलेल्या क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल द्यावा किंवा नोंदणीकृत मोबाईलवरून “ग्राहक क्रमांक” हा संदेश टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते व तसा संदेश ग्राहकाला मिळतो.

महावितरण संकेतस्थळ व मोबाईल ॲपचा वापर

महावितरणच्या बहुतांश ग्राहक सेवा ऑनलाईन झालेल्या आहेत. त्यासाठी ग्राहकांनी महावितरणचे ॲप प्लेस्टोअर किंवा ॲपस्टोअरहून डाउनलोड करावे. यामध्ये एकापेक्षा जास्त वीजजोडण्या एकदाच नोंदणी करून हाताळता येतात. याशिवाय महावितरणच्या संकेतस्थळावरही ग्राहक सेवा स्वतंत्रपणे दिल्या आहेत. ग्राहकांना घरबसल्या या सेवांचा लाभघेता येतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---