---Advertisement---
मुक्ताईनगर : राज्यात सध्या उन्हाची लाट पसरली असून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिक दगावण्याचे प्रमाण अत्यंत चिंताजनक झाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. एकनाथ खडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्री यांना पत्र लिहून उष्माघाताला तात्काळ नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे.
राज्यात आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे उष्माघाताने मृत्यू होत आहेत. या गंभीर परिस्थितीकडे आ. खडसे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात, यापूर्वीही विधिमंडळात तारांकित प्रश्न आणि औचित्याच्या मुद्द्याद्वारे या विषयावर सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. सध्या राज्याची परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की, खुद्द सरकारनेच खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशी नियमावली प्रसिद्ध केली आहे. शासनस्तरावर या संकटाचे गांभीर्य मान्य केले जात असताना, केवळ तांत्रिक कारणास्तव उष्माघाताचा समावेश नैसर्गिक आपत्तीत नसल्यामुळे मृतांच्या वारसांना व परिवाराला मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
१० लाखांची आर्थिक मदत द्यावी राज्य शासनाने या विषयावर तात्काळ कार्यवाही करून उष्म ाघाताला नैसर्गिक आपत्ती म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा, अशी म ागणीही आ. खडसे यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य सरकारने आपल्या विशेष निधीतून किंवा आपत्ती व्यवस्थापन निधीतून, उष्माघाताने मृत झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही आ. खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे.









