---Advertisement---
नवी दिल्ली : सर्व नामवंत लेखक आणि विचारवंतांच्या मतांचा आपण आदर करतो. परंतु, ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’कडून आलेली माहिती आपण स्वीकारू शकत नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केली.
केरळमधील शबरीमला मंदिरासह विविध धार्मिक स्थळांवर महिलांवर होणारा भेदभाव तसेच अनेक पंथांकडून आचरणात आणल्या जाणाऱ्या धार्मिक स्वातंत्र्याची व्याप्ती व कक्षा यासंबंधिच्या याचिकांवर सुनावणी करताना नऊ न्यायमूर्तीचा समावेश असलेल्या घटनापीठाने हे निरीक्षण नोंदवले.
या घटनापीठात सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. बी. व्ही. नागरत्ना, न्या. एम. एम. सुंदरेश, न्या. अहसानुद्दीन अमनुल्ला, न्या. अरविंद कुमार, न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसिह, न्या. प्रसन्न बी. वराळे, न्या. आर. महादेवन् आणि न्या. जॉयमाल्या बागची यांचा समावेश आहे.
दाऊदी बोहरा समाजाच्या प्रमुखांच्या वतीने बाजू मांडताना, ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी लिहिलेल्या एका लेखाचा संदर्भ दिला. या लेखात धार्मिक दिलाशाशी संबंधित बाबींमध्ये न्यायिक संयमाची चर्चा करण्यात आली होती.
आम्ही नामवंत व्यक्ती, कायदेतज्ज्ञ इत्यादींचा आदर करतो. परंतु, वैयक्तिक मत हे वैयक्तिकच असते, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी या टप्प्यावर म्हटले. कोणतेही विद्यापीठ चांगले किंवा वाईट, या भानगडीत पडत नाही. या चर्चेच्या दृष्टीने ती बाब खरोखरीच नगण्य आहे. मुद्दा केवळ इतकाच आहे की, ज्ञान आणि माहिती मग कुठूनही येत असो, त्याचा स्वीकार केला पाहिजे, असे कौल म्हणाले.
सर्व स्रोतांकडून ज्ञान ग्रहण करण्यात हरकत नाही
सर्व स्रोतांकडून ज्ञान ग्रहण करण्यात काहीच हरकत नाही, असे कौल म्हणाले. जर ज्ञान आणि शहाणपण कोणत्याही स्रोताकडून, कोणत्याही देशाकडून किंवा कोणत्याही विद्यापीठाकडून येत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. एक संस्कृती म्हणून आपण इतके समृद्ध आहोत की, ज्ञानाचे आणि माहितीचे सर्व प्रकार स्वीकारण्यात आपण मागे राहता कामा नये, असे कौल म्हणाले. न्या. नागरत्ना यांनी त्यावर हलक्या-फुलक्या शैलीत म्हटले की, पण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीकडून नाही. त्यावर कौल यांनी आपण त्या भानगडीत पडणार नसल्याचे सांगितले.









