---Advertisement---
नवी दिल्ली : डिसेंबरपर्यंत देशभरातील अनेक राष्ट्रीय महामार्गावर अडथळामुक्त ‘टोलिंग’ लागू केले जाईल, अशी घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी भारताने उत्तम पायाभूत सुविधा विकसित करायला हव्यात, असेही ते म्हणाले. ‘लॉजिस्टिक्स शक्ती समिट अँड अवॉर्ड च्या दुसऱ्या आवृत्तीला ते संबोधित करत होते.
गडकरी पुढे म्हणाले, डिसेंबरपर्यंत देशभरातील अनेक राष्ट्रीय महामार्गावर अनेक अडथळामुक्त टोलिंग प्रणाली स्थापित करण्याची आमची योजना आहे. ही नवीन प्रणाली ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन’ आणि ‘एआय ॲनालिटिक्ससह आरएफआईडी’ आधारित ‘इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन’ यांसारख्या एकात्मिक तंत्रज्ञानाचा वापर करून अडथळामुक्त टोलिंग सुलभ करते. याअंतर्गत, टोल प्लाझावर न थांबता, उच्च-कार्यक्षम कॅमेरे आणि रीडर्सद्वारे वाहनांची ओळख पटवून त्यांच्याकडून शुल्क आकारले जाईल.
गडकरी पुढे म्हणाले की, जर भारताला जागतिक महासत्ता बनायचे असेल तर देशाला मालवाहतुकीचा खर्च एका अंकी संख्येपर्यंत कमी करावा लागेल. आयआयटी चेन्नई, आयआयटी कानपूर आणि आयआयएम बंगळूर यांनी तयार केलेल्या एका ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की, भारतातील द्रुतगती मार्ग आणि आर्थिक कॉरिडॉरच्या बांधकामामुळे देशाचा लॉजिस्टिक्स खर्च १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. अमेरिकेत लॉजिस्टिक्सचा खर्च १२ टक्के, युरोपीय देशांमध्ये १२ टक्के आणि चीनमध्ये ८-१० टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले.
नियम तोडणाऱ्यांना बजावणार ई-नोटीस
गडकरी पुढे म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. तर कोणी नियमांचे पालन करत नसेल तर त्याला ई-नोटीस पाठवली जाईल. या नोटिसांचे पैसे न भरल्यास त्यांचा फास्टॅग निलंबित होऊ शकतो आणि वाहनांसंबंधी इतर दंड आकारले जाऊ शकतात.









