---Advertisement---
पश्चिम बंगालच्या राजकारणाला हादरा देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे चेहरे मानले जाणारे तसेच पश्चिम बंगालचे संभाव्य मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट (PA) चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत जवळून चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या दोन दिवसांत ही हत्या झाल्याने या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.
संभाव्य मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट (PA) चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर भाजपकडून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनीही तपासाला वेग दिला असून, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. हल्लेखोरांचा शोध सुरू असून, चंद्रनाथ रथ यांचे पार्थिव पोस्टमार्टमसाठी बारासात रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
चंद्रनाथ रथ हे केवळ राजकीय सहाय्यक नव्हते, तर सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय हवाई दलातून केली होती. एअरफोर्समधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले आणि नंतर राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले.
२०१९ साली सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये मंत्री असताना चंद्रनाथ रथ यांनी त्यांच्यासोबत काम सुरू केले. त्यानंतर जवळपास दोन दशकांपासून ते सुवेंदू अधिकारी यांच्या कोर टीमचा भाग होते. संघटनात्मक काम, प्रचार व्यवस्थापन, कार्यकर्त्यांशी समन्वय आणि राजकीय नियोजन अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ते सांभाळत होते. विशेष बाब म्हणजे चंद्रनाथ रथ यांचे कुटुंब पूर्वी तृणमूल काँग्रेसशी संबंधित होते. त्यांच्या आई हसी रथ यांनी पूर्व मेदिनापूरमध्ये पंचायत समितीवर पदही भूषवले होते. मात्र, सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रथ कुटुंबही भाजपमध्ये सहभागी झाले होते.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी पक्ष कार्यालयांवर हल्ले, तर काही भागात कार्यकर्त्यांमधील संघर्षाच्या घटनांनी वातावरण तणावपूर्ण झाले आहे.









