---Advertisement---
स्वतःच्याच अपहरणाचा बनाव करून वडिलांकडे ४० तोळे सोन्याची खंडणी मागणाऱ्या मुलाचा प्रताप मेहकर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी एका मित्राच्या मदतीने हे सर्व ‘नाट्य’ रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
जनार्दन काळे (रा. रायपूर ता. मेहकर) यांचा १९ वर्षीय मुलगा चेतन ६ मे रोजी बी.एस्सीची परीक्षा देण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका मेहकर येथील छगन भुजबळ महाविद्यालयात गेला होता. मात्र, सायंकाळपर्यंत तो परतला नाही. जनार्दन काळे यांना चेतनच्याच मोबाईलवरून दुपारी एक व्हिडीओ आणि संदेश प्राप्त झाला. या व्हिडीओमध्ये चेतनला बांधून ठेवल्याचे दिसत होते. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, त्याला जिवंत पाहायचे असेल तर, दोन तासांत ४० तोळे सोने घेऊन एकट्याने शेगाव रेल्वे स्टेशनवर या, अशी धमकी अज्ञाताने दिली होती. याप्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी तातडीने तपास पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविली. तपासादरम्यान, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नाशिक ग्रामीणमधील लासलगाव परिसरातून चेतन काळे आणि त्याचा मित्र विवेक सखाराम काकडे (रा. पोखरी) फाटा याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. आर्थिक अडचणीमुळे त्याने स्वतःच्याच अपहरणाचा डाव रचला होता. वडिलांकडून मोठी रक्कम किंवा सोने उकळण्यासाठी त्यांनी हा कट आखला होता. या प्रकरणात आणखी काही साथीदार असण्याची शक्यता असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक अवचार करीत आहे.









