जळगाव जनता सहकारी बँकेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘Best IT Risk Management’ पुरस्कार पटकावला….!

---Advertisement---

 

जळगाव जनता सहकारी बँकेने राष्ट्रीय स्तरावर मानाचा तुरा रोवला असून, बँकेला ‘Best IT Risk Management’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डिजिटल बँकिंग आणि सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे येथे ८ आणि ९ मे २०२६ रोजी CREST Infomedia यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १० व्या ‘All India Co-Operative Banking Summit and Awards 2026’ या भव्य परिषदेत देशभरातील २०० हून अधिक सहकारी बँकांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत माहिती तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जळगाव जनता सहकारी बँकेला टियर-३ श्रेणीतील ‘उत्कृष्ट आयटी रिस्क मॅनेजमेंट’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. बँकेने ग्राहकांच्या डिजिटल व्यवहारांची सुरक्षितता, डेटा संरक्षण आणि आधुनिक आयटी प्रणालीद्वारे जोखीम नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर विशेष दखल घेण्यात आली.

या दिमाखदार सोहळ्यात बँकेच्या वतीने आयटी विभागप्रमुख राकेश पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. बँकेच्या सुरक्षित आणि सक्षम आयटी व्यवस्थापन प्रणालीमुळे ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

हा पुरस्कार म्हणजे बँकेच्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धतीची आणि कर्मचारी वर्गाच्या समर्पित कार्याची मोठी पावती मानली जात आहे. बँकेचे व्यवस्थापन, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डिजिटल युगात सायबर सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होत असताना, जळगाव जनता सहकारी बँकेने मिळवलेला हा राष्ट्रीय सन्मान सहकार क्षेत्रासाठीही अभिमानाची बाब मानली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---