---Advertisement---
अमळनेर येथील रेल्वे स्टेशन परिसरात गंभीर जखमी झालेल्या गाईवर तात्काळ उपचार करून तिचे प्राण वाचविण्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या गोरक्षकांना यश आले. या घटनेमुळे परिसरात गोरक्षकांच्या तत्पर कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
शनिवार, दि. १० मे २०२६ रोजी पहाटे सुमारे सहा वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात एका गाईच्या पोटात लोखंडी पट्टी घुसल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. या प्रकारामुळे गाय गंभीर जखमी झाली होती. तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती.
घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद बजरंग दल, अमळनेरचे गोरक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने गाईवर त्वरित उपचार सुरू केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गाईची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
यावेळी गोरक्षकांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी लोखंडी व इतर धोकादायक वस्तू न टाकण्याचे आवाहन केले. मुक्या जनावरांच्या सुरक्षेबाबत प्रत्येक नागरिकाने संवेदनशील राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“गोमातेची सेवा हीच खरी मानवसेवा” असा संदेश देत गोरक्षकांनी भविष्यातही गोसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.









