जळगाव महानगरपालिकेतील १६ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार; निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याने उमेदवार अडचणीत….!

---Advertisement---

 

जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता अनेक उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक लढवलेल्या उमेदवारांपैकी तब्बल सोळा उमेदवारांनी अद्यापही आपला निवडणूक खर्चाचा हिशोब प्रशासनाकडे सादर केलेला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना ठराविक कालावधीत आपल्या निवडणूक खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक असते. मात्र अनेक उमेदवारांनी ही मुदत संपूनही आपला खर्च सादर न केल्याने प्रशासनाने त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसांनंतर काही उमेदवारांनी आपला खर्च सादर केला असला तरी अजूनही १६ उमेदवारांनी कोणताही हिशोब प्रशासनाकडे जमा केलेला नाही.

मुख्य लेखा परीक्षक तथा निवडणूक खर्च प्रमुख विजयकुमार सोनवणे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. या अहवालानंतर संबंधित उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी खर्चाचा तपशील सादर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र काही उमेदवारांनी या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

महानगरपालिका निवडणुकीत एकूण २४ उमेदवारांनी सुरुवातीला खर्चाचा हिशोब सादर केला नव्हता. प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर त्यापैकी आठ उमेदवारांनी निर्धारित कालावधीत आपला खर्च सादर केला. मात्र उर्वरित सोळा उमेदवारांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणामुळे आता संबंधित उमेदवारांची राजकीय अडचण वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार खर्चाचा तपशील न सादर करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेसह इतर प्रशासकीय कारवाई होऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---