गिरणा नदीत बैलगाडी बुडून बैलासह शेतकऱ्याचा मृत्यू; तीन तासांच्या शोधानंतर मृतदेह सापडला….!

---Advertisement---

 

जळगाव तालुक्यातील वडनगरी परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गिरणा नदीच्या पात्रातून बैलगाडी घेऊन जात असताना अचानक गाडी उलटल्याने एका शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वडनगरी येथील रहिवासी दिलीप रामभाऊ कल्याणकर वय ५५ हे आपल्या सहकाऱ्यासोबत शेतमजुरीसाठी जात होते. दररोजप्रमाणे सकाळच्या सुमारास ते बैलगाडीने गिरणा नदीचे पात्र ओलांडत होते. मात्र नदीपात्रातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने अचानक बैलगाडी उलटली आणि मोठा अनर्थ घडला.

या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने प्रसंगावधान राखत तात्काळ बैलगाडीतून उडी घेतली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र दिलीप कल्याणकर यांना स्वतःला सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि ते खोल पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नदीपात्रातून दिलीप कल्याणकर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या दुर्दैवी घटनेत बैलगाडीतील एका बैलाचाही मृत्यू झाला असून दुसऱ्या बैलाला वाचवण्यात यश आले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. वातावरण अत्यंत भावूक झाले होते.

मृत दिलीप कल्याणकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण वडनगरी परिसरावर शोककळा पसरली आहे. गावातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत कुटुंबीयांना धीर दिला.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---