अमळनेर रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीसह संशयित तरुण ताब्यात; लग्नाचे आमिष दाखवून पळविल्याचा आरोप…!

---Advertisement---

 

अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका तरुणासह अल्पवयीन मुलीस जीआरपी व आरपीएफच्या पथकाने ताब्यात घेतल्याची घटना घडली. चौकशीत संबंधित तरुणाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती समोर आली असून, याप्रकरणी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे.

७ एप्रिल २०२६ रोजी दुपारच्या सुमारास अमळनेर रेल्वे स्थानकावर जीआरपी व आरपीएफचे कर्मचारी नियमित गस्त घालत होते. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक तरुण व त्याच्यासोबत अल्पवयीन मुलगी संशयास्पद अवस्थेत बसलेली आढळून आली. पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेत अमळनेर लोहमार्ग पोलीस चौकीत चौकशीसाठी आणले.

चौकशीदरम्यान दोघांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर मुलीकडून तिच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधण्यात आला. संबंधित तरुणाने त्यांच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती मुलीच्या पालकांनी पोलिसांना दिली. तसेच या घटनेबाबत उत्तर प्रदेशातील मिर्झापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुलीचे पालक व संबंधित पोलीस अमळनेर येथे पोहोचेपर्यंत दोघांना ताब्यात ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत अल्पवयीन मुलीस बालसुधारगृहात रवाना केले. त्यानंतर तिला तिच्या पालकांच्या व संबंधित पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव राजराम कुमार गुप्ता (वय २२) असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून सध्या गुजरात येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत अमळनेर रेल्वे पोलीस चौकीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शिजवळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर विसावे, पोलीस हवालदार नरेंद्र लोंढे, घोराडे तसेच आरपीएफचे एएसआय कुलभूषण सिंग व हेड कॉन्स्टेबल नंदू पाटील यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---