आरोग्य विभागातील बदल्यांना नवे स्वरूप; गट-ब, गट-क, गट-ड कर्मचाऱ्यांसाठी वेळापत्रक जाहीर

---Advertisement---

 

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रियेला गती देत शासनाने स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुसूत्र करण्यावर भर देण्यात आला आहे.
१५ एप्रिल २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार समुपदेशनाद्वारे बदल्या करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार आरोग्य सेवा संचालकांनी आठही परिमंडळांतील कार्यक्रम प्रमुखांच्या बदल्यांचे टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर केले आहे. रिक्त पदांची यादी ६ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, बदलीपात्र कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी ८ मे रोजी जाहीर करण्यात आली आहे.


प्रपत्र १ ते ५ तयार करून नागरी सेवा मंडळासमोर १० मे रोजी सादर करण्यात आले असून, अंतिम बदली प्रस्ताव १५ मेपर्यंत पाठवले जाणार आहेत. समुपदेशनाद्वारे करण्यात आलेल्या अंतिम बदल्यांचे आदेश ३१ मे रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन धोरणानुसार बदल्यांमध्ये सेवा कालावधी, प्राधान्यक्रम, पसंतीक्रम, प्रशासकीय गरज तसेच दुर्गम भागातील सेवेला विशेष महत्त्व दिले जाणार आहे. अपंग कर्मचारी, गंभीर आजारांनी ग्रस्त कर्मचारी, विधवा महिला तसेच पती-पत्नी एकत्रीकरण आणि शैक्षणिक कारणांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.


बदली प्रक्रिया पूर्णपणे प्रशासकीय आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, कोणत्याही प्रकारचा बाह्य दबाव किंवा हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होऊन राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---