---Advertisement---
नवी दिल्ली : इराण-अमेरिका तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वित्झर्लंडमधील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत याबाबत संकेत दिल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मल्होत्रा यांनी म्हटले की, जागतिक तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास इंधनाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम भारतावरही होऊ शकतो. सध्या केंद्र सरकार आणि सरकारी तेल कंपन्या वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमतींचा काही प्रमाणात भार स्वतः सहन करत आहेत. उत्पादन शुल्क कमी ठेवणे आणि ग्राहकांवर पूर्ण भार न टाकणे अशा उपाययोजना केल्या जात असल्या तरी ही परिस्थिती दीर्घकाळ टिकवणे कठीण ठरू शकते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले असून अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला आहे. पेट्रोल-डिझेलचा मर्यादित वापर तसेच सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशाचा परकीय चलनसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात मोठी वाढ केली असून आयातीत वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणखी उपाययोजना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम आता महागाईवरही दिसू लागला आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 3.48 टक्क्यांवर पोहोचला असून मार्चमध्ये तो 3.40 टक्के होता. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत राहिल्यास वाहतूक, उत्पादन आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर दबाव वाढू शकतो.









