“रक्तदान हेच श्रेष्ठदान” रक्तदानातून दिले जीवनदानाचे संदेश; चिन्मय हॉस्पिटलमध्ये 60 रक्तपिशव्यांचे संकलन, रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

---Advertisement---

 

समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने शहरातील चिन्मय हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माधवराव गोळवलकर रक्तपेढी यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 60 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. युवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. विशेष म्हणजे मे महिन्यातील कडक उन्हातही रक्तदात्यांचा उत्साह कमी झालेला दिसून आला नाही. “रक्तदान हेच श्रेष्ठदान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी बोलताना डॉ. राहुल महाजन व डॉ. सोनाली महाजन यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. “अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी पीडित रुग्ण तसेच शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताची गरज कायम भासत असते. अशा वेळी एका रक्तदात्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करावे,” असे आवाहन त्यांनी केले. “प्रत्येक थेंब मोलाचा; करूया रक्तदान” हा संदेश देत त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे, असेही सांगितले.

रक्तदान शिबिरावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रक्तदात्यांचे स्वागत करून त्यांना रक्तदानाबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन प्रक्रिया पार पडली. रक्तदानानंतर रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच अल्पोपहार देण्यात आला.

या प्रसंगी भरतदादा अमळकर, संजय बिर्ला, नंदू आडवाणी, डॉ. स्वप्निल पाटील, अमित काळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच किरण बच्छाव, नितीन पाटील, गुरुप्रसाद तोतला, सचिन मंडोरा, विवेक बग्री, संतोष सिंग, समाधान बाफना आणि विनोद पाटील यांनीही उपक्रमाला भेट देत रक्तदात्यांचे कौतुक केले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी चिन्मय हॉस्पिटलमधील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---