शहादा पोलिसांची मोठी कारवाई; पावणे पाच लाखांच्या गांजासह दोघांना अटक…!

---Advertisement---

 

शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने असलोद दुरक्षेत्र हद्दीत सापळा रचून अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून तब्बल २० किलो ५६४ ग्रॅम सुका गांजा आणि एक मोटारसायकल असा एकूण ४ लाख ८१ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १५ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.

शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन इसम मोटारसायकलने मानवी मेंदूवर विपरित परिणाम करणाऱ्या सुक्या गांजाची विक्रीच्या उद्देशाने धडगाव कडून असलोद मार्गे शिरपूरकडे वाहतूक करत आहेत. या खात्रीशीर माहितीच्या आधारे प्रभारी अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांचे एक विशेष पथक कारवाईसाठी रवाना केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा पोलीस पथकाने पंचांसह असलोद-दामळदा रोडवरील एका संस्थान जवळील गेट जवळ रात्रीच्या वेळी दबा धरून सापळा रचला. काही वेळातच दामळदा रोडकडून असलोदकडे दोन संशयित इसम लाल रंगाच्या मोटारसायकलवर (क्रमांक एम एच ०३ बीके ७५११) काही बॅग्स घेऊन येताना दिसले. पथकाने त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:
1. सुशिल सुमा पावरा (वय ३० वर्ष, रा. मोहिदा, ता. शिरपूर, जि. धुळे)
2. गजेंद्र जितेंद्र पावरा (वय २१ वर्ष, रा. मोहिदा, ता. शिरपूर, जि. धुळे)

संशयितांना त्यांच्याकडील बॅग्सबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी त्यांच्याकडील एक झोला आणि दोन बॅग्सची झडती घेतली. त्यामध्ये २० किलो ५६४ ग्रॅम वजनाचा सुका गांजा आढळून आला. गांजा विक्री व वाहतुकीबाबत कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी गांजासह दुचाकी जप्त केली. वयाप्रकरणी दोन्ही आरोपींवर शहादा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५५७/२०२६, अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act – 1985) चे कलम ८(क), २०(ब)(ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 सदरची यशस्वी कामगिरी शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंतकुमार पाटील, सपोनि  संदीप वाघ, असई अशोक कोळी, पोहेकों बहादूर भिलाला, पोशि भगवान सावळे, कपिल मंदील, विकास शिरसाठ, भरत शिंपी आणि मिथुन सिसोदे यांच्या पथकाने केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---