साक्री-भोंदू बाबाकडून दुहेरी हत्याकांड; पूजाविधी आटोपल्यावर महिलेवर अतिप्रसंग, अवघ्या 2 तासांत आरोपी जेरबंद, पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली

---Advertisement---

 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रायपूर ते वर्धाने रस्त्यालगत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीचा छडा लावत त्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने दोन खुनांची धक्कादायक कबुली दिली.

निजामपूर पोलिसांना रायपूर ते वर्धाने मार्गावर सुझुकी अॅक्सेस-125 (क्र. MH-18 CH-8151) जवळ एका महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईलच्या आधारे महिलेची ओळख जयश्री रजनीकांत काकुस्ते (हिरे), रा. कासारे, ता. साक्री अशी पटली. अधिक तपासात संबंधित महिला पुजाविधीसाठी जैताणे शिवारात गेल्याची माहिती समोर आली.

यानंतर पोलिसांनी गोपनीय आणि तांत्रिक तपास सुरू करत संशयित योगेश बापू खैरनार, रा. जैताणे, ता. साक्री याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने पोलिसांना सांगितले की, जयश्री काकुस्ते आणि तिचा मित्र अक्षय गंगाधर सोनवणे, रा. जैताणे हे पुजाविधीसाठी त्याच्याकडे आले होते. विधी संपल्यानंतर महिलेस घरी सोडण्यासाठी जात असताना आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करत आरडाओरड सुरू केल्याने आरोपीने तिचा गळा आवळून खून केला.

यानंतर मृत महिलेचा मित्र अक्षय सोनवणे याने तिच्याबाबत विचारणा केल्याने आरोपी घाबरला. पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने अक्षय सोनवणे याच्यावर लोखंडी टॉमीने डोक्यावर आणि बरगड्यांवर वार करून त्याचाही खून केला. त्यानंतर मृतदेह जंगलातील काटेरी झुडपात फेकून पुरावे नष्ट करण्यासाठी जाळण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती तपासात समोर आली.

दरम्यान, निजामपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात भाग-5 गुन्हा रजिस्टर नं. 151/2026 अन्वये BNS कलम 103 आणि 238 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, नामदेव सहारे, पोउनि मधुकर सोमासे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---