---Advertisement---
पाचोरा शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून येथील भडगाव रोडवरील एका शाॅपिंग माॅल जवळील गल्लीतुन एका महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत धूम स्टाईल ओरबाडून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. भयभीत महिलेने स्वतःला सावरत पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील चिंतामणी काॅलनी येथील रहिवासी जि. प. शिक्षिका वैशाली योगेश मोरे त्यांची बहिण रेखा भिमराव चव्हाण यांचेसह भडगाव रोडवरील जय भवानी शाॅपिंग माॅल मध्ये संसारोपयोगी वस्तू घेण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान किरकोळ खरेदी करुन घरी परतत असताना एक अज्ञात इसम त्याचे वय अंदाजे ४० वर्ष याने पायी पाठलाग करत घरा जवळील गल्लीत अंधाराचा फायदा घेत वैशाली मोरे यांचे गळ्यातील २ लाख ४० हजार रुपये किंमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओरबाडून काही अंतरावर लावलेल्या त्याचे मोटर सायकलवरून पोबारा केला. वैशाली मोरे व रेखा चव्हाण यांनी आरडाओरड करुन चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. हताश झालेल्या वैशाली मोरे यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठले व अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन तपास पो. नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. कृष्णा घायाळ हे करीत आहे.
पाचोरा शहरात भुरट्या अवैध धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून जणू काही पोलिसांचा धाक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शहरात चोऱ्यांचे प्रमाण ही वाढत चालले आहे. नुकतीच पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भरदिवसा उभी असलेल्या कारच्या काचा फोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेची चोरी करून पोबारा केला सदर घटनेबाबत गुन्हा दाखल होऊन अद्याप चोर मिळून आलेला नाही त्यापूर्वी शिंधी कॉलनी भागात झुलेलाल मंदिरातून चांदीच्या मुर्त्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत ही पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देवुन वाढती गुन्हेगारी थांबवावी. भडगाव रोड, जारगाव चौफुली, बस स्थानक रोड, वरखेडी रोड, गिरड रोड,जळगाव चौफुली, या भागात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी. तसेच पाचोरा बस स्थानकात कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देखील नागरिकांमधुन होत आहे.









