---Advertisement---
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि ‘फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही’ या विकृत मानसिकतेतून एका पतीने आपल्या 24 वर्षीय पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथे उघडकीस आली आहे. आरोपी पतीने पत्नीला बेदम मारहाण करत तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
पतीने गाठलेला क्रौर्याचा कळस म्हणजे या अमानुष कृत्यानंतर आरोपीने पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात न नेता तब्बल 15 दिवस घरातच डांबून ठेवले होते. असह्य वेदनांनी महिला जिवाच्या आकांताने ओरडत होती.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, 20 एप्रिल रोजी आरोपी पती मद्यधुंद अवस्थेत घरी आला. “तू कामावर जातेस, तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते सांग,” असे म्हणत त्याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण सुरू केली. त्यानंतर आरोपीने धमकी देत ॲसिडची बाटली आणून तिच्या गुप्तांगावर ओतले.
वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेने घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने घराचा दरवाजा आतून बंद करून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या जावेने सासू-सासऱ्यांना फोन करून बोलावले. मात्र तोपर्यंत आरोपीने “कोणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकीन,” अशी धमकी देत घरातून पळ काढला.
9 मे रोजी आरोपी कामावर गेल्याची संधी साधून पीडितेने आपल्या दोन मुलींना सोबत घेत थेट माहेर गाठले. तिथे तिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. घटनेने हादरलेल्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर पीडितेने 15 मे रोजी अधिकृत तक्रार दिली असून त्यानुसार आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.









