१.६१ कोटींच्या फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी चाळीसगावातून जेरबंद; कारवाईमुळे मोठ्या आर्थिक गुन्ह्याच्या तपासाला वेग…!

---Advertisement---

 

आहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेत आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईमुळे मोठ्या आर्थिक गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “अँसीटेक सोल्युशन्स” या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून फिर्यादी अवधुत विनायक केदार (रा. शेवगाव, जि. आहिल्यानगर) यांची तब्बल १ कोटी ६१ लाख ४२ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील फरार आरोपी सागर सुधाकर पवार (वय ३५, रा. डोणगाव, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) हा चाळीसगाव शहर परिसरात लपून बसल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांच्या पथकाने चाळीसगावमध्ये शोधमोहीम सुरू केली.

पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अशोक पाटील आणि आशुतोष सोनवणे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपी मोतीबाग नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ आपल्या नातेवाईकांच्या घरी राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखा, आहिल्यानगर यांच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल चाळीसगाव शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---