मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

---Advertisement---

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कथित आर्थिक अपहाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू होताच, तक्रारदार सचिन रवींद्र माळी यांच्या कुटुंबावर कुऱ्हाड आणि लाठ्या-काठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मोरफळ शिवारात घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मोरफळ येथील सचिन माळी (वय २७) यांनी ‘मनरेगा’ योजनेतील खोट्या मस्टर हजेरी आणि पैशांच्या अपहाराबाबत २१३ पानांची सविस्तर तक्रार नाशिक विभागीय आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीच्या गांभीर्यावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी पारोळा गट विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.

ही कायदेशीर चौकशी सुरू झाल्यामुळे घोटाळ्यात सहभागी संशयितांचे धाबे दणाणले होते. तक्रार मागे घेण्यासाठी सचिन माळी यांच्यावर सतत दबाव आणला जात होता व धमक्या दिल्या जात होत्या.

२२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मोरफळ शिवारातील शेत गट नं. ८९/२ च्या बांधावर सचिन माळी यांचे काका छोटू हिरामण माळी हे काम करत असताना संशयितांनी तेथील झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यास सुरुवात केली. त्यास विरोध केला असता संशयित प्रवीण गोपिंचद माळी याने कुऱ्हाडीने छोटू माळी यांच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.

जमिनीवर पडलेल्या छोटू माळी यांना प्रशांत माळी व गणेश माळी यांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली. काकांना वाचवण्यासाठी धावून गेलेल्या सचिन माळी यांच्यावरही गणेश माळी याने काठीने हल्ला केला, ज्यामध्ये त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. जखमींवर धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू असतानाच, आरोपींच्या साथीदारांनी ग्रीन पार्क हॉटेलजवळ सचिन माळी यांच्या गाडीवर दगडफेक केली. या दुसऱ्या हल्ल्यात गाडीवर पाठीमागे बसलेले हरचंद सुखदेव माळी हेदेखील जखमी झाले.

पारोळा पोलिसांनी या प्रकरणी प्रवीण गोपिंचद माळी, प्रशांत प्रवीण माळी, गणेश प्रवीण माळी, गोपिंचद राजाराम माळी, मोतीलाल अर्जुन माळी, मोहन मोतीलाल माळी, राहुल मोतीलाल माळी, लाडकुबाई गोपिंचद माळी, गणेश अंबु माळी, छाया प्रवीण माळी, मयूर गणेश माळी आणि चेतन पोपट महाजन यांच्याविरुद्ध  गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल हितेश  चिंचोरे करत आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---