पाचोऱ्यात तरुण व्यावसायिकाचा लॉजमध्ये संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की हत्या? गिरड परिसरात शोककळा….

---Advertisement---

 

पाचोरा शहरातील तरुण व्यावसायिक रविंद्र संजय मोरे (वय २५, रा. गिरड ता. भडगाव) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी समोर आली. जळगाव रोडवरील एका लॉजमध्ये त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. या घटनेमुळे पाचोरा शहरासह गिरड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या धक्कादायक घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गिरड येथील रहिवासी रविंद्र मोरे हे पाचोरा शहरातील नगरपालिका जिन्यातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये “मालक मेन्स वेअर” नावाचे दुकान चालवत होते. गुरुवारी दुपारी सुमारास जळगाव रोडवरील याराना हॉटेलच्या लॉजिंगमध्ये त्यांनी गळफास घेतल्याची माहिती समोर आली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ करीत आहेत.

मृत रविंद्र मोरे यांनी अल्पावधीत स्वतःचा व्यवसाय उभा करून व्यापारी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक निधनाने व्यापारी वर्गात शोक व्यक्त होत आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

मयत रविंद्र यांच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडाही झाला होता. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

या मृत्यूबाबत नातेवाईकांकडून संशय व्यक्त करण्यात येत असून आत्महत्या की अन्य काही कारण, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---