---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात चोरट्यांच्या टोळीने दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचे चित्र समोर आले आहे. चिंतामणी मोरया परिसरातील काही धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यापूर्वी समोर आलेल्या फुटेजमध्ये तोंडाला काळे मास्क बांधलेले चार संशयित परिसरात फिरताना दिसले होते. आता समोर आलेल्या नव्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या टोळीचा आणखी धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एक महिला घराच्या दिशेने जात असताना तिच्या मागे एक संशयित येताना दिसतो. त्याचवेळी इतर तीन जण अचानक बाजूच्या गल्लीतून समोर येतात.
संशयितांना पाहताच महिला घाबरून मदतीसाठी आरडाओरड करत धावत सुटते. मात्र, टोळीतील सदस्य तिचा पाठलाग करत असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
याच टोळीने परिसरातील एका दुकानासह एका बंद घरातही चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे धरणगाव शहरात चोरट्यांचा वाढता वावर आणि त्यांची निर्भय हालचाल याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.









