गुलाबराव पाटलांना मोठा धक्का? जळगाव विधान परिषदेची जागा भाजपकडेच कायम? राजकीय समीकरणांना नवे वळण….!

---Advertisement---

 

जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला असताना जळगावची जागा भाजपकडेच कायम राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या जागेवर दावा करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

१८ जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर जोरदार चर्चा सुरू होती. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जागावाटपाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवल्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यांच्या बैठका पार पडल्या. त्यातून जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.

विशिष्ट सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत भाजप ११ जागा, शिवसेना शिंदे गट ४ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ जागांवर निवडणूक लढवणार आहे. सुरुवातीला संभाजीनगर आणि नाशिक या दोन जागांवरून मतभेद होते. मात्र अखेर संभाजीनगर भाजपकडे तर नाशिक शिंदे गटाकडे देण्यावर सहमती झाल्याचे समजते.

जळगावच्या जागेसाठी शिंदे गटाने सुरुवातीपासूनच जोरदार प्रयत्न केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाचा आधार घेत ही जागा आपल्याला मिळावी, अशी भूमिका पक्षाने घेतली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही पुत्र प्रताप पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा केला होता. मात्र भाजपने जळगावची जागा आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही १७ पैकी १५ जागांचे वाटप निश्चित केले असून काँग्रेस ८, ठाकरे गट ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. जळगावची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने येथे थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

जळगावमध्ये भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मात्र जागा न मिळाल्यामुळे शिंदे गटातील नाराजी निवडणुकीवर परिणाम करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात तर काही प्रमाणात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष पाठबळ मिळू शकते, अशा चर्चांनाही उधाण आले आहे.

महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे यामुळे जळगावची विधान परिषद निवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या लढतींपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---