---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांनी पहाटेच्या गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलाजवळ एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाला होता. त्यावेळी परिसरात गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या सेकंड मोबाईल पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच वाहन चालकासह दोन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले, तर वाहनातील अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान संशयितांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही. वाहनाची तपासणी केली असता एक देशी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल फोन आणि बनावट क्रमांक प्लेट आढळून आली. यावरून हे आरोपी गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांना आला.
या प्रकरणात चंद्रकांत विष्णू वाघ आणि कैलास कारभारी घोडके यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध बीड, पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर, धाराशिव, नाशिक आणि संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे सुमारे १८ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती.
अटक करण्यात आलेल्या आरोपी चंद्रकांत वाघ याच्याविरुद्धही विविध जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये वाहन चोरी, दरोड्याची तयारी आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. नाशिक, संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२८/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









