रात्रीतून तयार झालेला रस्ता सकाळीच उखडला; जळगावात रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप, नागरिक संतप्त….!

---Advertisement---

 

जळगाव शहरातील बजरंग बोगदा परिसरात नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रात्री डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता दुसऱ्याच दिवशी सकाळी सहज हाताने उखडत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

परिसरातील काही नागरिकांनी नव्याने तयार झालेल्या रस्त्याची पाहणी केली असता डांबराचा थर अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप केला. त्यांनी रस्त्याचा भाग हातानेच उखडून दाखवत या कामाची गुणवत्ता उघड केली. याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात या कामाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जळगावमध्ये रस्ते बांधकामांच्या दर्जाबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, नव्याने तयार झालेला रस्ता अवघ्या काही तासांत उखडल्याचा दावा झाल्याने सार्वजनिक बांधकामांच्या देखरेखीवर आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

या प्रकरणी संबंधित यंत्रणांकडून काय भूमिका घेतली जाते आणि रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---