---Advertisement---
मुंबईत कौटुंबिक अत्याचाराचे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून एका व्यक्तीने पत्नीचा छळ करण्यासाठी क्रूरतेची परिसीमा गाठल्याचा आरोप आहे. कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नीला बेदम मारहाण करत तब्बल चार तास ‘कोंबडा’ बनवून ठेवल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
आरसीएफ पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अरबाज सय्यद याने पत्नीला घरात कोंडून ठेवत तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. हातात तलवार घेऊन जीवे मारण्याची तसेच चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. यानंतर पत्नीला चार तास शिक्षा म्हणून ‘कोंबडा’ बनून राहण्यास भाग पाडण्यात आले.
या छळाला कंटाळून पीडित महिलेने कशीबशी सुटका करून घेत आपल्या माहेरी आश्रय घेतला. मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत माहेरीही धडक दिली. तेथे त्याने गोंधळ घालत पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपासात अरबाज सय्यद हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघड झाले असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध स्वरूपाचे १९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जखमी महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.









