---Advertisement---
यावल-भुसावळ मार्गावरील रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत असून वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, सिमेंट काँक्रीट रस्त्याला गेलेले तडे आणि वादळामुळे रस्त्यावर व बाजूला कोसळलेली झाडे-झुडपे यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
यावल शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील भाग तसेच राजोरा फाटा ते अंजाळे पाटचारी दरम्यान दोन वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, हा रस्ता अवघ्या वर्षभरातच मधोमध आणि कडेला सरळ रेषेत तडकू लागल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यावरील या तड्यांमुळे दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांसाठी मोठा धोका निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडू शकतो.
याशिवाय रस्त्यावरील डांबरी भागात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांकडून वारंवार करण्यात येत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि झुडपे रस्त्याच्या बाजूला तसेच काही ठिकाणी थेट रस्त्यावर कोसळली आहेत. ही झाडे अद्याप हटविण्यात आलेली नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदाराने मंजूर आराखडा आणि अंदाजपत्रकानुसार काम न केल्याचा आरोप केला आहे. विशेषतः रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्यांची कामे अपूर्ण राहिल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता खालावल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली का, तसेच त्याला काळ्या यादीत टाकण्याबाबत कोणती पावले उचलली, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे, तडे गेलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची दुरुस्ती करणे आणि रस्त्यावर पडलेली झाडे-झुडपे हटविणे यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. तसेच आमदार अमोल चौधरी यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून संबंधित विभागाकडून तात्काळ कार्यवाही करून घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक आणि वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.









