---Advertisement---
यावल शहर आणि परिसरात बालमजुरीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून चार अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. रसवंती आणि रुमाली रोटी तयार करण्याच्या व्यवसायांमध्ये बालकामगार म्हणून काम करत असल्याचे आढळून आल्यानंतर संबंधित तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजपूर रस्त्यावरील चितोडा शिवारात असलेल्या एका रसवंती केंद्रावर तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान दोन १३ वर्षीय मुलांना बालकामगार म्हणून कामावर ठेवण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्काळ दोन्ही मुलांची सुटका केली. याप्रकरणी संबंधित व्यावसायिक सचिन धांडे यांच्याविरुद्ध बाल कामगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या मांडा अर्थात रुमाली रोटी तयार करण्याच्या दुकानावरही पोलिसांनी छापा टाकला. येथे एक १२ वर्षीय आणि एक १३ वर्षीय मुलगा काम करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या दोन्ही बालकामगारांची मुक्तता करून त्यांना संरक्षणाखाली घेतले.
या प्रकरणी आसिफ खान कुरेशी आणि आजीम साहेब या दोघांविरुद्धही बाल कामगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे दोन्ही कारवायांमध्ये एकूण चार बालकामगारांची सुटका करण्यात आली असून तीन जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून पोलीस हवालदार राजेंद्र पवार तपास करीत आहेत.









