---Advertisement---
ST महामंडळाच्या १० टक्के हंगामी भाडेवाढीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यभरातील लाखो प्रवाशांना आता १५ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढीव भाडेदरानेच प्रवास करावा लागणार आहे.
उन्हाळी गर्दीच्या हंगामात महामंडळाच्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने एसटी प्रशासनाने १५ एप्रिल २०२६ पासून साध्या बससेवांच्या भाड्यात १० टक्के हंगामी वाढ लागू केली होती. या निर्णयानुसार वाढीव भाडेदरांची मुदत १५ जून रोजी संपुष्टात येणार होती. मात्र, इंधनाच्या वाढत्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली.
साधी आणि मिडी बससेवांसाठी प्रति टप्पा दर ११.०५ रुपये कायम राहणार आहे. तसेच किमान प्रवासभाडे प्रौढ प्रवाशांसाठी १४ रुपये आणि मुलांसाठी ७ रुपये असेच राहणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर आणखी काही काळ अतिरिक्त भार पडणार आहे.
महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत एप्रिल २०२६ ची आकडेवारी चिंताजनक चित्र समोर आणणारी ठरली आहे.महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ करूनदेखील ST महामंडळाला एप्रिल महिन्यामध्ये ७६ कोटींचा तोटा झालेला दिसून येतो. मागील वर्षी एप्रिल २०२५ मध्ये कोणतीही हंगामी भाडेवाढ लागू नसताना महामंडळाने १४ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता.









